न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑक्टोबर २०२०) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या सोमवारपासून (दि. १२) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. सुमारे अडीच लाख विद्यार्थी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परीक्षेची तयारी पूर्ण केली असून विद्यार्थ्यांनीसुद्धा ‘ मॉक एक्झाम’ द्वारे परीक्षेचा सराव केला आहे. सर्वाधिक विद्यार्थी मोबाईलद्वारे परीक्षा देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील अंतिम वर्षाच्या परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर घेतल्या जाणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध केले असून येत्या १२ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरु होणार आहेत. विद्यापीठातर्फे ऑनलाईन परीक्षेसाठी ‘ पीपल्स स्ट्रांग टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ‘ या एजन्सीची निवड करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे चारही विद्याशाखेतील विषयांची परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करुन अंतिम वर्षांची परीक्षा आयोजित करणारे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील आपले एकमेव विद्यापीठ आहे. तांत्रिक कारणामुळे परीक्षेत व्यत्यय आला किंवा अन्य अडचणी निर्माण झाल्या तर विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेतली जाईल. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. विद्यार्थी व पालकांनी विद्यापीठास सहकार्य करावे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.