- सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एक कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १२ ऑक्टोबर २०२०) :- वाकड पोलिसांनी अटक केलेल्या सराईत आरोपींकडून तब्बल पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी ११ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय ३१, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे), विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (वय १९, रा. पिसवली, कल्याण) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
२० सप्टेंबर रोजी वाकड रोड येथे पीआर ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान फोडून तीन किलो चांदी व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी निगडी येथील नावकर ज्वेलर्स मधून २० किलो चांदीचे दागिने आणि २६ सप्टेंबर रोजी पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स हे दुकान फोडून पाऊण किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याबाबत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.
वाकड पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर यांची दोन पथके तयार करून या गुन्ह्याचा तपास सुरु केला. निगडी येथील सराफ दुकानापासून काही अंतरावर एक इको कार संशयास्पद आढळली. त्यावरून पोलिसांनी त्या कारचा शोध घेतला असता लोणी काळभोर आणि लोणीकंद येथून दोन इको कार चोरीला गेल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आपली शोधमोहीम पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेर खराडी, लोणीकंद, चंदननगर, वाघोली भागात सुरु केली. तब्बल दहा दिवस त्या परिसरात तळ ठोकून वाकड पोलिसांनी हे चोरीचे गुन्हे करत असलेल्या टोळीचा शोध लावला.
सराईत गुन्हेगार विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी आणि त्याची टोळी हे गुन्हे करत असून कल्याणी हा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कल्याणी हा दरोडा, जबरी चोरी, खून यांसारख्या ४१ गंभीर गुन्ह्यात अटक होता. तसेच त्याच्यावर आणखी १५ गंभीर गुन्हे दाखल होते. पोलिसांच्या एका पथकाने सापळा लाऊन व्हेरना कार (एम एच ०५ / ए एक्स ९३७६ ) सह आरोपी कल्याणी आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले. दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. वाकड पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशा यांनी कौतुक केले आहे.