न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरीतील लालटोपीनगर सर्कस मैदानावर एका झाडाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरीत्या कल्याण मटका सुरु होता. पिंपरी-चिंचवड पोलिस सामाजिक सुरक्षा पथकाला याची कुणकुण लागताच या जुगार अड्ड्यावर छापा मारला. ऐवज जप्त करत पोलिसांनी १९ जणांना अटक केली.
या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबईल फोन, पेन, कल्याण मटका साहित्य असे एकूण ८५ हजार ३९० रुपयांचे साहित्य जप्त केले. आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम १८८, २६९, ३४, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ), साथीचा रोग अधिनियम १८९७ कलम ३, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम २००५ चे कलम ५० (ब), महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सोमवारी (दि. १२) दुपारी करण्यात आली. विनय कुमार उर्फ पाल्या राम सहजीवन कुर्मी (वय ३६, रा. लालटोपीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या मटका चालक मालकाचे नाव आहे.