न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात घरफोडीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी घरातील ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. १२) सकाळी लांडगेवस्ती, भोसरी येथे उघडकीस आली.
याप्रकरणी धीरज देविदास धारपवार (३०, रा. लांडगे वस्ती, भोसरी) यांनी सोमवारी (दि. १२) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धारपवार हे लांडगे वस्तीतील तानाजी लांडगे यांच्या बिल्डींगमध्ये राहतात. रविवारी (दि. ११) रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपी गेले. रात्रीच्या वेळी चोरटे उघड्या दरवाजावाटे घरात आले. त्यांनी घरातून मोबाईल फोन, सोन्या चांदीचे दागिने, कागदपत्रे, मोबाईल फोन ठेवलेली पर्स असा एकूण ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला.
दुसऱ्या घटनेत दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील चार लाख ६४ हजारांचे दागिने आणि रोकड चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. ९) दुपारी दीड ते साडेपाच या वेळेत संत तुकारामनगर, मोरवाडी येथे घडली. या प्रकरणी सॅमसंग बेजामीन शेफर्ड (वय ५५, रा. म्हाडा बिल्डींग, मोरवाडी, पिंपरी) यांनी सोमवारी (दि. १२) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी शेफर्ड यांचे घर शुक्रवारी दुपारी दीड ते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुलूप लावून बंद होते. दरम्यान दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या सेफ्टी दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण चार लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. उपनिरीक्षक वैभव सोनावणे तपास करीत आहेत.