न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२०) :- पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. १२) दुपारी दीडच्या सुमारास भोसरी येथील मयुरी पॅलेस मंगल कार्यालयाच्या समोरील मोकळ्या मैदानात करण्यात आली.
निखिल राजकुमार ढाबळे (२३, रा. सावंतनगर, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खंडणी दरोडाविरोधी पथकाचे पोलिस नाईक आशिष बोटके यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी निखिल याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सन २०१८ मध्ये दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो पुणे जिल्ह्याच्या परिसरात पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता आला, याची माहिती खंडणी दरोडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.