न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- गंभीर गुन्ह्यात फरार सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पिंपरी शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी कारवाई केली.
आकाश उत्तम शिनगारे (वय २३, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आकाश पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूध्द निगडी, भोसरी, चिखली, खडक या पोलीस ठाण्यात दंगल घडविणे, चोऱ्या, मारामारी गंभीर दुखापत, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे एकुण २० गुन्हे दाखल आहेत.
त्याला चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी आकाश याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून पती – पत्नीला कोयत्याने मारहाण करून पत्नीच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली होती. दुसऱ्या गुन्ह्यात आरोपीने एकाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्या व्यक्तीने दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून आरोपी आकाश याने त्याला लाथाबुक्क्यांनी आणि कोयत्याने मारून जखमी केले. तिसऱ्या गुन्ह्यात कार चालकाला मारहाण करत आरोपी आकाश याने त्याचे दात पाडले.