- भंगार मालाची नोंद ठेवण्याची केली सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- मुख्य रस्त्यावर भंगार विक्रीचा व्यवसाय थाटून वाहतुकीला अडथळा करणाऱ्या व्यावसायिकांची मनमानी चिंचवड भागात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिकेचा अतिक्रमण विभाग, पोलीस प्रशासन व वाहतूक शाखा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. अशाप्रकारे मनमानी करणाऱ्या व्यावसायिकांवर वचक ठेवण्यासाठी चिंचवड पोलिसांनी मुख्य रस्त्यावर भंगार विक्री करण्यास बंदी घातली आहे.
चिंचवड पोलीस ठाण्याच्यावतीने परिसरातील भंगार विक्रेत्यांची बैठक आयोजित केली होती. या वेळी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. या बैठकीस परिसरातील १५ भंगार व्यावसायिक उपस्थित होते. चिंचवड गावातील चापेकर चौकातून आकुर्डीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भंगार व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. यामुळे या भागात वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे.
रस्त्याच्या दुतर्फा भागात भंगाराचे साहित्य ठेवले जात होते. यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. दिवसेंदिवस या भागातील रस्ता येथील व्यावसायिकांनी गिळंकृत केला आहे. मुख्य रस्त्यावर भंगार विक्रीचा वाहतुकीस निर्माण होईल असा व्यवसाय करू नये आणि एक नोंदवही ठेवून त्यामध्ये भंगार मालाचे वर्णन, माल कोठून आला व त्याचा संपूर्ण तपशील, माल आल्याची तारीख, माल कोणाला विकला याची नोंद ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.