- बेशिस्त रिक्षाचालकांना दिला आठवडाभराचा अल्टिमेटम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) :- शहरातील गुन्हेगारी सेखण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी विविध उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून वाहतुकीला शिस्त लावण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यात सुरुवातीला शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यांना आठवड्याचा ‘ अल्टिमेटम ‘ देण्यात आला आहे.
पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून शहरातील तसेच चौक बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. रिक्षाचालक बेदरकारपणे रिक्षा चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. तसेच गणवेश, बॅचबिल्ला वाहन चालविण्याचा परवाना आदी कागदपत्रे न बाळगता मास्क, सैनिटायझर याचा वापर करीत नाहीत. तसेच चौक व रस्त्यात रिक्षा बेशिस्तपणे पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणून अपघाताला निमंत्रण दिले जाते. यातून रिक्षाचालकांची व वाहतूक व्यवस्थेची प्रतिमा मलीन केली जाते. या प्रकारांना आळा बसावा म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत.
तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रिक्षाचालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी रिक्षात प्लास्टिक पडदा बसविला पाहिजे. मात्र, काही रिक्षाचालक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. रिक्षाचालक व मालक यांनी स्वच्छ गणवेश, बॅचबिल्ला, वाहन चालविण्याचा परवाना तसेच रिक्षाचे कागदपत्र आदींची पूर्तता करावी; अन्यथा आठवडाभरानंतर अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येईल.