- महापौर उषा ढोरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- शहरातील वेगवेगळया भागांमध्ये ब-याच ठिकाणी मोजकेच लोक मासे विक्रीसाठी घेऊन येतात. तसेच शहरात मासे विक्रेत्यांसाठी ठराविक आणि निश्चित अशी जागा दिसून येत नाही. त्यामुळे शहरातील बरेचसे मासे विक्रेते हे सध्या रस्त्याच्या कडेला अथवा नागरी भागात मासे विक्रीसाठी बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मासे विक्रेत्याकडील मासे विक्री करुन शिल्लक राहिल्यास दुस-या दिवशी न विकलेले मासे ठेवण्यामाठी शहरातील मासे विकेत्यांकडे मासे साठविण्याची अत्याधुनिक यंत्रणा तसेच पुरेशी व्यवस्था नसल्याने मासे लवकर खराब होतात.
ही खराब मासळी रस्त्यांच्या कडेला टाकून दिल्यास घाणीच्या साम्राज्यामुळे तेथील परिसरात दुर्गंधी पसरते. तसेच तेथून ये-जा करताना नागरिकांना दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागतो. याचबरोबर शहराच्या विद्रुपीकरणात देखील भर पडत आहे. शहरातील नागरिकांना ताजी मासळी मिळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक मच्छी मार्केट असणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे महापालिकेकडून मासे विक्रेत्यांना मासे विक्रीसाठी जागा निश्चित करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्केट उपलब्ध करुन देणे भविष्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात होलसेल मच्छी मार्केट उभारल्यास नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची ताजी मासळी ही एकाच ठिकाणी मिळून खरेदी करण्यासाठी लागणारा वेळ, श्रम पैसादेखील वाचणार आहे. या मच्ची विक्रेत्यांसाठी मूलभूत सोयी सुविधायुक्त गाळे उभारण्याकरिता महापालिकेने शहरात मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध द्यावी, अशी मागणी महापौर माई उर्फ उषा ढोरे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.