- कोविड निधीत भेदभाव करताना कुठे होती आपली तल्लख बुद्धी…
- आधी आपल्या दिव्याखालचा अंधार तपासा; राष्ट्रवादीच्या संदीप काटेंचा पक्षनेत्यांवर पलटवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- पुणे जिल्ह्यातुन कोरोना विषाणू हद्दपार करण्यासाठी व कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आण्णासाहेब मगर स्टेडीयम या ठिकाणी पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने राज्य शासन, पीएमआरडीए यांच्या माध्यमातुन जम्बो कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. राज्य सरकार व पीएमआरडीएचे लक्ष नसल्यामुळे येथील ठेकेदाराने नर्स व इतर स्टाफ यांच्या हातावर तुरी देत त्यांचा पगार लटकवला व त्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले. या प्रकारास पालकमंत्री अजित पवारच जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला होता. त्यावर पिं. चिं. शहर राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी जोरदार पलटवार करीत पक्षनेते नामदेव ढाके व सत्ताधारी भाजपच्या पारदर्शक कारभाराचा बुरखा फाडला आहे.
प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडकरांना कोरोनातून मुक्त करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत करण्याऐवजी भाजपच्या नगरसेवकांनी १ कोटी २७ लाखांचा निधी केंद्राच्या पंतप्रधान सहायता निधीला दिला. याची खंत न बाळगता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी राज्य सरकारचा स्वतंत्र निधी वापरून शहरात ८१६ बेडच्या ‘जम्बो कोविड सेंटर’ची उभारणी केली. त्यासाठी स्थानिक भाजप पदाधिका-यांनी एक छदाम देखील दिला नाही. असे असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पक्षनेते नामदेव ढाके हे कोणत्या नैतिक अधिकाराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करतात ?
कोरोनाचा प्रादुर्भाव असताना नागरिकांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत. यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचा फंड उपलब्ध करून नेहरूनगर येथे ६१६ अद्यावत ऑक्सिजन बेड आणि २०० आयसीयू बेडचे ‘जम्बो कोविड सेंटर’ अल्पावधीत उभे केले. रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्यामुळे आज शहरात कोरोनाबाधितांचा उच्चांकी आकडा झपाट्याने कमी होताना दिसत आहे. अजित पवार यांच्यामुळेच शहर कोरोनामुत्त होत आहे. तरी, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. ‘जम्बो कोविड सेंटर’ची यंत्रणा कशी कार्यरत आहे, याची पाहणी करण्याचा सोपस्कार देखील ढाके यांनी कधी केला नाही. ‘जम्बो कोविड सेंटर’ उभारण्यात भाजपचे काहीही योगदान नाही. असे असताना आपण कोणत्या अधिकाराने पालकमंत्री अजितदादांवर आरोप करतो, याचे ढाके यांनी आत्मपरिक्षण करावे, असा टोमणाही काटे यांनी लगावला आहे.
संपूर्ण शहर कोरोना विषाणुच्या यातना भोगत असताना भाजपच्या नेत्यांनी सुध्दा ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत केली नाही. यावरून भाजपच्या कारभा-यांना शहरातील नागरिकांची किती काळजी आहे, हे स्पष्ट होते. राज्य सरकारने पिंपरी-चिंचवडमध्ये उभारलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’वर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असते. मात्र, भाजपच्या एकाही पदाधिका-याने या जम्बो रुग्णालयाकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही. ठेकेदारांची बाजू घेऊन अजितदादांवर आरोप करणा-या भाजप पक्षनेत्यांनी स्वतःच्या नैतिक जबाबदारीचे भान ठेवावे, असा सल्लाही काटे यांनी दिला आहे.