- भगत वस्ती, धावडे वस्तीतील पावसाच्या पाण्याला दिली वाट मोकळी करून…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- शहरात बुधवारी (दि. २१) मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भगत वस्ती, धावडे वस्ती, भोसरी येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होऊ लागला. आरोग्य विभागाचे कर्मचारी येण्यास वेळ लागणार असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘क’ प्रभागाचे क्षेत्रीय अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी स्वतः हातात लोखंडी पहार घेत पाण्याला वाट मोकळी करून दिली.
भगतवस्ती, धावडेवस्ती हा भाग इंद्रायणीनगर, हवेली हॉटेल परिसर, खोलगट भागात आहे. याठिकाणी दोन्ही बाजूला भाजी मंडई आहे. बुधवारी – झालेल्या मुसळधार पासवामुळे चारी बाजूने येणारे पाणी भगतवस्तीमध्ये घुसले. भाजी मंडईसमोरच्या रस्तावर पाणी गुडघ्यापेक्षा वर आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांबरोबरच मंडईमधील गाळ्यामध्ये पाणी शिरते की काय, अशी परस्थिती निर्माण झाली.
क्षेत्रीय अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी यासंदर्भात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु, ते इतर ठिकाणी व्यस्त असल्यामुळे त्यांना येण्यास वेळ लागणार होता. त्यामुळे लांडगे यांनी कर्मचाऱ्यांची वाट न पहाता हातात लोखंडी पहार घेत रस्त्यावरील पाण्याला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे साचलेले पाणी कमी होण्यास मदत झाली.