न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात प्रशासनाने खासगी बाऊन्सरची सुरक्षा पुरविली आहे. त्यांना आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वायसीएममध्ये ३१ जानेवारी २०२१ पर्यंत बाऊन्सरची सुरक्षा असणार आहे.
नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व रुग्णांच्या नातेवाईकांकडून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले होते. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची सुरक्षा म्हणून पालिकेने तत्काळ खासगी बाऊन्सरची सुरक्षा पुरविली आहे. त्याचा कालावधी ३१ ऑक्टोबरला संपत आहे.
प्रोटेक्शनपावर बाऊन्सर या एजन्सीकडून ३ महिने कालावधीसाठी ८ बाऊन्सर घेण्यात येणार आहेत. ते रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना या पुढेही सुरक्षा पुरविणार आहेत. या खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मंजुरी दिली आहे.