- पालिका आयुक्त व अति. आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आक्षेप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- पात्रता नसताना वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांच्याकडे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. या तो काढून घ्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
डॉ. डांगे यांच्याकडे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचे कामकाज दिले आहे. महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून वैद्यकीय विभागामध्ये त्या कामकाज करतात. मात्र, डॉ. डांगे यांच्याकडे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदाचा कार्यभार सोपविला नसल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार देण्याच्या प्रस्तावावर आयुक्तांनी सही केली आहे.
डॉ. डांगे या मनमानी कारभार करत असून, पालिकेचे सर्व भत्ते, सोईसुविधा, वाहनाचे लाभ घेत आहेत, असा आरोप निकाळजे यांनी केला आहे. डॉ. डांगे यांच्याविरुद्ध अनेक तक्रारीप्राप्त झाल्या असूनही, त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांच्याकडे कोरोना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे. त्यातही बनावट माहिती दिली जात आहे, असा आरोप निकाळजे यांनी केला आहे. डांगे यांना तातडीने ज्येष्ठ पदावरून हटवून त्या जागी सेवाज्येष्ठतेनुसार योग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.