न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२०) :- सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू होती. यावेळी दुचाकीवरून निघालेल्या दोघांना कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी मास्क न घातल्याने अडवले. यावेळी तरुणाने थेट अंगावर धावून जात दमदाटी करत पोलिसांना शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे.
अभिषेक राजू टेंकल (१८) आणि हरिश गणेश कांबळे (१८) यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही पुण्यातील शिवाजीनगर येथे वास्तव्यास आहेत. हरिश कांबळे याच्यावर याअगोदर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवार गार्डन येथे पोलीस कर्मचारी विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. तेव्हा, दुचाकी वरून आलेल्या आरोपी अभिषेक टेंकल आणि हरीश कांबळे या दोघांना पोलीस कर्मचाऱ्याने अडवले. मात्र, अरेरावी करत थेट पोलिसांची कॉलर आरोपीने धरून अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली. तुझ्या अंगावर वर्दी आहे म्हणून नाहीतर इथे दाखवलं असतं अशा पद्धतीने आरोपी धमकावत होता.