न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) :- निघोजे गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीकाठी आरोपी दारुची भट्टी लावून गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार हातभट्टीवर छापा टाकला. त्यावेळी आरोपी दारू तयार करून वाहतूक करताना आढळून आले.
त्यांच्याकडून आठ हजारांची रोकड, ७४ हजार ७५० रुपयांची हातभट्टीची दारू, दारूचे चार लाख ५० हजारांचे कच्चे रसायन, दोन लाख ७० हजार रुपयांची वाहने, तसेच १० हजार ८०० रुपयांचे मोबाइल असा एकूण आठ लाख १३ हजार ५५० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.
फकिर हसन पटेल (वय ३६, पद्मावती झोपडपट्टी, कात्रज), दीपक मधुकर करे (वय २३, रा. निराधार नगर, पिंपरी, सध्या रा. शांती काॅलनी, काळेवाडी), नागेश जगन्नाथ सूर्यवंशी (वय २४, रा. निराधारनगर, पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.