न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२०) :- एटीएम फोडणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांनी आठ एटीएम फोडल्याचे कबूल केले आहे. आरोपीकडून १० हजार रुपये, २२ लाखांच्या मालमत्तेची कागदपत्रे तसेच १ लाख ७० हजार रुपयांच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
एटीएम मशीनमध्ये कैश भरणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संगणमत करुनच आरोपीनी एटीएम फोडल्याचे तपासात समोर आले आहे. मनोज उत्तम सूर्यवंशी (वय ३०, रा. पिंपरी), किरण भानुदास कोलते (वय ३५, चिखली), महेश आनंद देवणीकर (वय ३०, रा. कात्रज), सागर पोपट तावरे (वय ३१), तुषार कुंडलिक, चिंचवड, नरलिंग मायन धुमाळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
माऊलीनगर व वडमुखवाडी, दिघी येथील दोन एटीएम मशिन फोडून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. एटीएम फोडीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक शंकर बाबर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पिपरी येथे सापळा रचून मनोज सूर्यवंशी आणि किरण कोलते यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता वाकड, देहूरोड, चाकण, निगडी, पिंपरी, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन ठिकाणी गुन्हे केले आहेत.