न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२०) :- फिर्यादीचा चाफेकर चौक, चिंचवड येथे फ्लॅट आहे. ‘तो फ्लॅट विकून मला दिवाळीला दुचाकी घ्यायला पैसे दे’ अशी मागणी आरोपी मुलाने जखमी आईकडे केली. त्यावर ‘फ्लॅटच्या विक्रीबाबत बोलणी सुरु आहेत’ असे आईने आरोपी मुलाला सांगितले. आई मुलाला समजावून सांगत असताना आरोपी मुलाने जळणातील लाकडाच्या ढीगा-यातून दांडके काढून आईला बेदम मारहाण केली.
यामध्ये वृद्ध आईच्या हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली. याबाबत मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. १०) दुपारी मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे घडला.
इंदुबाई दीपक चव्हाण (वय ६०, रा. चाफेकर चौक, चिंचवड. मूळ रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे जखमी आईचे नाव आहे. याबाबत त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रदीप दीपक चव्हाण (वय ३५, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.