- बिजलीनगरमध्ये पोलीस मित्र व एसपीओ स्वयंसेवकांचा सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२०) :- यंदाची दिवाळी कोरोनाच्या सावटाखाली असून पोलीस यंत्रणेवर त्याचा सर्वात जास्त ताण आहे. पिंपरी चिंचवड शहरानेही ८५००० कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पार केला आहे. अश्या वातावरणात पोलीस ठाणे अंतर्गत प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे स्वयंसेवक हे गस्त, वाहतूक नियमन, अतिरिक्त बंदोबस्त या करिता सहकार्य करण्यास तयार आहेत.
बिजलीनगर येथें पोलीस मित्र – एसपीओ स्वयंसेवक यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मुख्य संपादक आकाश मोरे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य संपर्क प्रमुख विजय मुनोत, विभाग प्रमुख सतीश देशमुख, समिती अध्यक्ष विजय पाटील, उद्धव कुंभार, गोपाळ बिरारी, लक्ष्मण इंगवले यांची होती. या प्रसंगी शाहूनगर, शरदनगर, चिखली परिसरातील स्वयंसेवकांना ओळखपत्र, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
आकाश मोरे म्हणाले,” गेले अनेक वर्ष प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे स्वयंसेवक, पोलीस मित्र सातत्याने नागरिक हितासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे पोलीस विभागासही बंदोबस्त व गस्त करिता कोरोना काळात त्यांची विशेष मदत होत आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचा परीघ मोठा आणि विस्तृत असल्याकारणाने समितीच्या स्वयंसेवकांची उपस्थिती ही वेळोवेळी महत्वाची ठरते.
समितीचे विभाग प्रमुख सतीश देशमुख म्हणाले,” चिखली – एम आय डी सी – भोसरी परिसरात कामगार रहिवाशी संकुलांची संख्या वाढलेली आहे. त्याचबरोबर वाढत्या गुन्हेगारीनेही डोके वर काढलेले आहे. स्वसंरक्षण आणि सामाजिक जबाबदारी म्हणून समितीचे स्वयंसेवक, पोलीस मित्र,एस पी ओ पोलीस विभागास सहकार्य करीत आले आहेत व यापुढे मदत दिली जाईल.
समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे स्वयंसेवक,एस पी ओ हे वर्षभर सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होत असतात तसेच पोलीस प्रशासनास सहकार्यही करीत असतात. दिपावलीच्या पावन पर्वात पोलीस कर्मचारी वर्गावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असतो तसेच काही पोलीस ठाण्यांमध्ये संख्याबळही अपुरे असते त्याकरिता आमच्या संस्थेचे स्वयंसेवक गस्त व बंदोबस्तासाठी तयार आहेत, शहरातील पोलीस ठाण्यांनी तशी मागणी केल्यास आमचे स्वयंसेवक विनामूल्य सेवा करणार आहेत.”
या प्रसंगी संजय महाजन, सुरेश गावडे, प्रकाश पानस्कर, सुनिल वाघ, कडूबाळ शिंदे, बळीराम शिरसाठ यांना ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुनोत यांनी केले. आभार प्रदर्शन लक्ष्मण इंगवले यांनी केले.