- वाचा.. कशी करावी धनत्रयोदशीची पूजा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२०) :- दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. अश्विन कृष्ण त्रयोदशी हा दिवस धनत्रयोदशीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अपमृत्यु टळावा याकरिता ‘यमदीपदान’ म्हणजे यमासाठी प्रदोषकाळी संध्याकाळी घराबाहेरच्या बाजूस दिवा लावून ठेवावा.
धनत्रयोदशीचे आणखी महत्व आयुर्वेदाच्या उपासकांसाठी आहे. आयुर्वेदाचा प्रवर्तक, चौदा रत्नांपैकी एक रत्न असणाऱ्या धन्वंतरीचा हा जन्मदिन. या दिवशी सर्व वैद्य धन्वंतरी पूजन, धन्वंतरी यागाचे अनुष्ठान करतात.
अशी करावी धनत्रयोदशीची पूजा :-
धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील साठा राखीव निधी म्हणून पिढीजात ठेवलेले सोनेनाणे, निरनिराळे अलंकार, दागदागिने घासून पुसून स्वच्छ करावेत आणि या धनसंग्रहासह विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग यांचे पूजन करावे. खिरीचा किंवा धणे व गूळ यांचा नैवेद्य दाखवावा.या पूजेसाठी झेंडूच्या फुलांचे महत्व आहे. तेव्हा ती फुलेही आवर्जून पूजेत समाविष्ट करावीत. पूजा झाल्यानंतर नैवेद्य भक्षण करावा आणि नेहमीप्रमाणेच रांगोळी, तोरणे, दिवे यांनी दीपावली साजरी करावी.
🎇शुभ दीपावली!🎇