- सूरडीतील पंचायत समिती सदस्याच्या पतीवर बिबट्याचा हल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस आष्टी तालुक्यात वाढत असून सुरडी येथील पंचायत समिती सदस्य आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ते जागीच ठार झाले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मोराळा ता आष्टी पंचायत समिती गण सदस्या आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे हे सुरुडी येथील रहिवाशी असून ते दुपारी दोन वाजता घरून वाघदरा या आपल्या शेताकडे पाणी देण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गर्जे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर ते ओरडले होते. मात्र मदत न मिळाल्याने बिबट्याने त्यांचा जीव घेतला. त्यानंतर मात्र सायंकाळपर्यंत ते न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह शेताकडे आढळून आला.
बिबट्याच्या हल्ल्यात चेहरा आणि मानेवर गंभीर दुखापत झाली होती. सर्व चेहरा छिन्न विच्छिन्न झाला होता. ही माहिती कळताच धामणगाव येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. वायभासे यांनी सुरुडीला भेट दिली आणि गर्जे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आष्टीच्या रुग्णालयात पाठविला. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.