न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२०) :- हॉर्न वाजविला म्हणून चिडून जाऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार व लोखंडी कोयत्याने मारहाण करून तरुणाला गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या मित्रालाही मारहाण केली. याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. अमोल बसवराज वाले (वय ३३) आणि मेघराज संजयवाले (वय २५, दोघे रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
आरोपी मेघराज हा दोन महिन्यांपूर्वी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अजय प्रकाश सोनवणे ( वय २४ , रा . निगडी ) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात २७ नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली. त्यानुसार अमोल वाले, राजू वाले, आनंद वाले (सर्व रा. निगडी) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
फिर्यादी हे २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ओटास्किम येथून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी मुले तेथे खेळत असताना फिर्यादींनी दुचाकीचा हॉर्न वाजवला. यावरून आरोपीनी परिसरात दहशत निर्माण केली.