न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२०) :- पुणे व पिंपरी – चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयामधील अकरावीच्या प्रवेशासाठी राबविली जात असलेली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून एसईबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या संवर्गातील जागांमध्ये वाढ झाली आहे.
विद्यार्थ्यांना आता २९ हजार ८३५ जागांसाठी अर्ज करता येणार आहेत. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया खोळंबली होती. परंतु, शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशामुळे प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून एसईबीसी आरक्षणासाठी राखिव ठेवण्यात आलेल्या जागा आता खुल्या संवर्गात आल्या आहेत.
त्यामुळे २० हजार ९१४ ऐवजी आता २९ हजार ८३५ जागांवर खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. विद्यार्थ्यांनी यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जातील कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम बदलले तर त्यांना घराजवळील किंवा आवडीचे महाविद्यालय मिळू येऊ शकते. खुल्या संवर्गाच्या जागा वाढल्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश अर्ज अंतर्गत बदल करत आहेत, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.