- केंद्राकडून व्यावसायिकांची यादी तयार; नोटीसा पाठविणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२०) :- वस्तू व सेवा कराची ( जीएसटी ) नोव्हेंबरमधील विवरणपत्रे न भरणाऱ्या २५ हजार व्यावसायिकांची जीएसटी नोंदणी रद्द केली जाऊ शकते. या व्यावसायिकांना लिखित संदेश आणि ई – मेलद्वारे आधी नोटीस पाठवून विवरणपत्रे भरण्याची सूचना केली जाईल. त्यानंतरही त्यांनी विवरणपत्रे भरली नाहीत, तर त्यांची जीएसटी नोंदणी रद्द केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
मागील सहा महिन्यांपासून त्याहीपेक्षा जास्त काळापासून विवरणपत्रे न भरणाऱ्या ५,४३,००० व्यावसायिकांची जीएसटी नोंदणीही रद्द करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाली. नोव्हेंबरमध्ये विवरणपत्रे न भरणाऱ्या व्यावसायिकांकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना बैठकीत जीएसटी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, असे एका वरिष्ठ महसुली अधिकाऱ्याने सांगितले.
ऑक्टोबरमधील व्यवसायाची विवरणपत्रे २० नोव्हेंबरपासून पुढे पाच दिवसांच्या आत भरणे नियमानुसार आवश्यक आहे. ती न भरणाऱ्या व्यावसायिकांची यादी तयार करण्यात आली आहे. कर विवरणपत्रे प्रक्रियान्वित करणाऱ्या ‘ जीएसटीएन ‘ कंपनीला सुचना देऊन करदात्यांना एका दिवसात एक लाख लिखित संदेश आणि ई – मेलद्वारे स्मरणपत्रे पाठविण्यास सांगण्यात आले आहे.