- तिथं जे घडलं त्याचं दुःख; मात्र, वाचाळविरांना जबरदस्त चपराक – अजित पवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२०) :- विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी केलं.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड हे ४९ हजार मताधिक्याने विजयी झाले. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतिश चव्हाण ५८ हजार मताधिक्याने विजयी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. मात्र त्याचवेळी त्यांनी भाजपाचाही खास आपल्या शैलीत समाचार घेतला आहे.
अमरावतीची जागा जिंकली असती तर समाधान मिळालं असतं. तिथं जे घडलं त्याचं दुःख असल्याची खंत अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बोलून दाखवली. “नागपूर आणि पुण्यात बऱ्याच वर्षांपासून पदवीधर मतदारसंघांमध्ये एका पक्षाची मक्तेदारी होती. मात्र सुशिक्षित वर्ग देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. पदवीधर, शिक्षक मतदार आमच्या पाठीशी आहेत हे सिद्ध झालं. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावं घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. मात्र हा निकाल म्हणजे त्या वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. आता लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय हे या निकालांवरुन स्पष्ट झालं आहे,” असं अजित पवार म्हणाले.