न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२०) :- सतत टीव्ही बघतो म्हणून सावत्र आई मुलाला रागावली. त्यावरून १३ वर्षीय मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चिखली येथे घडली. रमजान अब्दुल शेख (वय १३, रा. जाधववाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान हा सतत टिव्ही बघत होता. त्यामुळे त्याची सावत्र आई रमजानला रागविली. आई रागावली म्हणून चिढलेल्या रमजानने मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यात तो बेशुद्ध पडला.
रमजानने गळफास घेतल्याचा प्रकार निदर्शनास येताच त्याच्या घरच्यांनी त्याला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला बुधवारी पहाटे पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी रमजानचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.