- कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते ‘कोरोनायोद्धा’ पुरस्कराने सन्मानित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२०) :- भोसरीतील जेष्ठ समाजसेवी व उद्योजक शाम आगरवाल यांनी कोरोना काळात केलेल्या अमुल्य योगदानाबद्दल उद्योजक परिवाराच्या वतीने त्यांना कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन बालरोगतज्ञ डॉ. सुनील लोहाडे, उद्योजक राजेंद्र रांका, गुरु बहीरगोंड व आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
डॉ. लोहाडे म्हणाले, शाम आगरवाल यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करताना आनंद होत आहे. रस्त्यावरील भटक्या-मुक्या प्राण्यांना पाणी व चारा, धान्य, भाकरी अन्न देवून त्यांनी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून त्यांची सेवा केली आहे. अचानक लॉकडाऊनमुळे गाव व घरापासून दूर असणाऱ्या शेकडो ट्रक ड्रायव्हर व त्यांच्या मदतनिसांना धान्याचे कीट देऊन त्यांची मदत केली. वैष्णव माता मंदिर येथील मंदिरात दिवाळी फराळ वाटपसारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. मानवसेवा व जीवदया क्षेत्रातील या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार केला.
शाम आगरवाल म्हणाले, भगवंताने आपणास जे काही दिले आहे, त्यामध्ये समाजाचाही काही वाटा असतो. तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रत्येकाने दिला पाहिजे. हीच आमच्या मातेची शिकवण आहे. यात लक्ष्मणासारखे माझे बंधू बाळासाहेब सदैव पाठीशी उभे आहेत. मुलगा राकेश, दीपक, सनी ही पुढची पिढीही हा आदर्श पाळत आहे, यातच आनंद वाटतो.