- सहा हजार शिक्षक सेवक भरतीची प्रक्रिया होणार सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सेवक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सहा हजार शिक्षक सेवक भरतीची प्रक्रिया सुरु होत असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरु झालेली भरतीची प्रक्रिया कोरोनामुळे अडखळली होती. मात्र आता कोरोना काळातील पदभरतीवरील बंदीतून ५ पवित्र पोर्टल प्रक्रिया वगळण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे अर्धवट असलेली भरती प्रक्रिया पूर्णत्वास जाणार आहे. शासनाने पारदर्शकपणे भरती करण्यासाठी २०१७ मध्ये अभियोग्यता चाचणी घेतली होती. त्यात पात्र ठरलेल्या पावणेदोन लाख उमेदवारांना पवित्र पोर्टलवर घेऊन त्यांच्याकडून शाळांचे प्राधान्यक्रम भरून घेतले होते.
मुलाखतीविना होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी यादी जाहीर करून साडेतीन हजार उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीही दिली. मात्र मुलाखतीसह होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया बाकी होती. त्यातच कोरोनाचा कहर सुरू झाल्याने शासनाच्या वित्त विभागाने मे २०२० मध्ये सर्व प्रकारच्या पदभरतीवर बंदी घातली होती.