- श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२०) :- ”ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम”…. असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष … दुपारचे बारा वाजले … घंटानाद झाला … समाधीवर पुष्पवृष्टी … संत नामदेव महाराज व माऊलींची भेट … आणि मर्यादित उपस्थित भाविकांचे पाणावलेले डोळे … अशा भावपूर्ण वातावरणात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा रविवारी (दि. १३) ‘ माऊली माऊली’च्या जयघोषात उत्साहात पार पडला.
तत्पूर्वी, माऊलींना पवमान अभिषेक व दुधारती घालून पहाटेच्या सुमारास प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सकाळी वीणामंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. सकाळी दहाला संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे कीर्तन सुरू झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संजीवनसमाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
घंटानाद , अभिषेक आणि माऊलींच्या समाधीवर विविध फुलांची पुष्पवृष्टी करून आरती घेण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांमार्फत वीणा मंडपातून करंज्या मंडप, पंखामंडप व मुख्य गाभाऱ्यात माऊलींच्या समाधीच्या पुढे विराजमान करून माऊलीनामाचा जयघोष करण्यात आला. मानकरी, पदाधिकारी, सेवेकरी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
‘ माऊली- माऊली ‘ जयघोष करीत चोपदारांच्या वतीने माऊलींच्या पालखीने मंदिराला प्रदक्षिणा घालून रात्री उशिरा ‘ श्रींच्या गाभागात देवस्थानच्या वतीने नारळ प्रसाद वाटून व्रयोदशीची सांगता झाली. आज (दि. १४) रात्री छबिना कार्यक्रमाने संजीवन सोहळ्याची सांगता करण्यात येईल.