सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीनंतरच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२०) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी येत्या २३ डिसेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. दरवर्षी सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात दहावीची परीक्षा घेतली जाते. परंतु, कोरोनामुळे यंदा मार्च महिन्यात परीक्षा घेणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे यंदा एप्रिल – मे २०२१ महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता राज्य मंडळाने व्यक्त केली आहे. कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जुलै २०२० मध्ये जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता २०२१ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा कधी होणार, याची विद्यार्थी पालकांमध्ये उत्सुकता होती. नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज येत्या २३ डिसेंबर ते ११ जानेवारी २०२१ या कालावधीत नियमित शुल्कासह सरल डाटावेसवरून ऑनलाइन पद्धतीने स्वीकारणार असल्याचे मंडळाने सांगितले आहे.
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीनंतर होतील, असे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने आपल्या पाठयक्रमात ३० टक्के आणि महाराष्ट्र सरकारने २५ टक्के कपात केली आहे. पालक, शिक्षणतज्ञ आणि विद्यार्थी यांच्या सूचनेनंतर ही कपात करण्यात आली आहे.