- मुलगी गंभीर जखमी; मावशी विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ०६ जानेवारी २०२०) :- शेजारी राहणाऱ्या एका मुलीसोबत पूर्वी भांडणे झाली होती. त्यामुळे त्या मुलीबरोबर तू खेळायला जाऊ नको असे मुलीची मावशी तिला म्हणत असे. मात्र, त्या नंतरही मुलगी ही मुलीबरोबर खेळत असल्याने मावस आजीला त्याचा राग आला. या रागाच्या भरात त्यांनी झाऱ्या गरम करुन अंगावर ठिकठिकाणी चटके दिले. यात तिच्या गालाला, तोंडाला आणि हाता-पायाला भाजले आहे.
जडिता विश्वनाथ वाघमारे (वय ७०, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सारिका प्रदीप गायकवाड (वय ३३, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. वाघमारे या गायकवाड यांच्या मावस मावशी आहेत. पिडित मुलीच्या त्या आजी लागतात.
ही घटना ३० डिसेंबरला दुपारी बाराच्या सुमारास घडली. मावस आजीने दिलेल्या चटक्यामुळे प्राची उर्फ जान्हवी (वय ९) ही मुलगी जखमी झाली आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी फिर्यादींच्या मावशी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.