- एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२१) :- खंडणीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. साहिल उर्फ साईनाथ वसंत धोतरे (वय २१, रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस गस्त घालत असताना पोलीस शिपाई विजय दौंडकर यांना माहिती मिळाली की, दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी साहिल धोतरे टेल्को रोड, भोसरी येथे विजय सेल्सच्या समोर थांबला आहे.
त्यानुसार, पोलिसांनी विजय सेल्स परिसरात सापळा लावून साहिल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सन २०१८ साली खंडणीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली.