- वाकड पोलीस ठाण्यात महिलेकडून फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जानेवारी. २०२१) :- २९ वर्षीय तरुणाने ३० वर्षीय महिलेवर अनेक वेळा बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांची ओळख टिंडर डेटिंग अॅपवर झाली होती. लग्नाचं आमिष दाखवून आरोपींने अनेकवेळा बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.
डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर तरुणाने बलात्कार केल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. वाकड पोलीस ठाण्यात महिलेनं फिर्याद दाखल केली असून, अनेक वेळा बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आरोपी एका खासगी कंपनी कामाला आहे. महिला विधवा असून, गृहिणी आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
“दोघांचं एकमेकांशी बोलणं होण्यापूर्वी आणि भेटीपूर्वी आरोपीने लग्न करण्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर आरोपीनं अनेक वेळा बलात्कार केला. जेव्हा महिलेनं आरोपीकडे लग्नाबद्दल विषय काढला, तेव्हा त्याने बूट फेकून मारला आणि महिलेवर हल्ला केला,” असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेणं सुरू केलं आहे. आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६(२)(न), ३७७ आणि ३२३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.