- मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते अनुप मोरे ‘शंभू गौरव’ पुरस्काराने सन्मानित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२१) :- शिवपूत्र संभाजीराजे राज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा ३४१ वा राज्याभिषेक सोहळा शौर्यपीठ तुळापुरात उत्साहात साजरा झाला. यंदा ट्रस्टच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांचा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील राणी येसूबाईची भुमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते मानाच्या ‘शंभू गौरव’ विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्यभिषेक दिनाच्या निमत्ताने तुळापूर गावातून संभाजी राजांची पालखी काढण्यात आली. त्यानंतर शंभूवंदना होऊन महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला.
सन्मानार्थी अनुप मोरे म्हणाले की, ”राज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोऊन उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महारांजी केला. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल, असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. आजच्या युवकांना छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास खुणावतोय, त्यासाठी युवकांनी सज्ज व्हावे.”
कार्यक्रमास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, छत्रपती संभाजी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप कंद, सिद्धांत कंक, आकाश कंक, सर्व पदाधिकारी व तुळापूर ग्रामस्थ तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शंभूभक्त उपस्थित होते.