- चिंचवड पोलीसांकडून ६५ वाहनमालकांचा शोध घेण्यात यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२१) :- शहरातील जप्त केलेली ८० वाहने चिंचवड पोलीस ठाण्याच्या आवारात असून, त्यातील ६५ वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यात यश आले आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेनुसार शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे स्मार्ट करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचा उपक्रम चिंचवड पोलिसांकडून राबविण्यात आला.
त्यासाठी मावळ तालुक्यातील परंदवडी येथील गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, शिवाजी जव्हेरी यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला. वाहनमालकांनी वाहनांची कागदपत्रे तसेच स्वतःचे ओळखपत्र सादर करून वाहने घेऊन जावीत. जे मालक वाहन घेऊन जाणार नाहीत ती बेवारस वाहने म्हणून कायदेशीर प्रक्रिया करून त्या वाहनांचा लिलाव केला जाईल, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले आहे.