- आमदाराचा लोगो वापरणारे कार्यकर्तेही रडारवर..
- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा कारवाईचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२१) :- शहरातील पोलिस मित्र संघटना पोलिसांच्या ‘लोगो’ चा वापर करू लागल्या आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कोणत्याही संघटनेला असा लोगो वापरता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, आगामी काळात पोलिसांचा लोगो वापरणाऱ्या संघटनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सोमवारी (दि. १८) पोलिस आयुक्तालयात पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. या व्यतिरिक्त पोलिस मित्राप्रमाणे शहरात ह्युमन राइट नावाचा वापर करून अनेक संस्था स्थापन झाल्या आहेत. त्यापैकी काहीजण पोलिस ठाण्यात जाऊन आपणच शासनाच्या ह्युमन राइटचे अधिकृत सदस्य असल्याप्रमाणे वागत आहेत. तुमची अशासकीय संस्था असून त्याप्रमाणे वागा, अन्यथा तुमच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी या वेळी दिला.
आमदाराचे स्टिकर असणाऱ्या वाहनांवरही कारवाई…
याबाबत बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, आमदारांच्या स्वतःच्या चार – पाच गाड्या असतील आणि त्यावर आमदार म्हणून लिहिले असेल तर पोलिसांची त्यास काही हरकत नाही. मात्र जर आमदाराच्या नावावर कोणी कार्यकर्ता गाडीवर आमदार म्हणून लिहीत असेल तर अशा वाहनांवर निश्चितच कारवाई केली जाईल.