- यांनी घेऊ नये लस; अन्यथा दुष्परिणाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२१) :- देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर ६०० हून अधिक जणांवर लसीचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘ कोव्हॅक्सिन ‘ लसीच्या वापराबाबत भारत बायोटेकने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. काही विशिष्ट लक्षणे किंवा इतर आजारांवर काही उपचार सुरू असलेल्यांनी ही लस घेऊ नये, असा इशारा कंपनीने दिला आहे.
भारत बायोटेकने कोरोनाविरुद्ध कोव्हॅक्सिन ही लस विकसित केली आहे. देशभरात पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी भारत बायोटेकने लसीचे ५५ लाख डोस पुरविले आहेत. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी दिल्लीमध्ये कोव्हॅक्सिन दिलेल्यांपैकी ५१ जणांवर दुष्परिणाम दिसून आले होते. त्यानंतर भारत बायोटेकने लस घेण्याबाबत काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होण्यास कारणीभूत ठरणारे वैद्यकीय उपचार असणाऱ्यांनी लस घेऊ नये, असे कंपनीने म्हटले आहे. या शिवाय कोव्हॅक्सिनच्या व्यतिरिक्त इतर लस घेतली आहे, अशानीही ही लस घेऊ नये, असे भारत बायोटेकतर्फे सांगण्यात आले आहे. लसीचे अतिशय गंभीर दुष्परिणाम दिसल्यास भारत बायोटेककडून नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
या लोकांनी लस घेऊ नये…
वैद्यकीय उपचार सुरू आहेत. गर्भवती व स्तनदा माता. रक्त पातळ करणारी औषधे घेणारे, अॅलर्जीचा पूर्वेतिहास असणारे, रक्तस्रावाचा विकार असलेले.
काय होऊ शकतो त्रास…
कोव्हॅक्सिनमुळे तीव्र स्वरूपाची अलर्जिक प्रतिक्रिया शरीरावर उमटू शकते. मात्र, असे क्वचितच होत असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. श्वास घेण्यास त्रास होणे, घसा आणि चेह-यावर सूज येणे, हृदयाची गती वाढणे, शरीरावर रॅशेस उमटणे, थकवा आणि गुंगी येणे अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे लस घेण्यापूर्वी लसीकरण अधिका-याना या सर्व गोष्टीची माहिती द्यावी.