- शासनाच्या महसूल विभागाकडून महापालिकेला नोटीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने त्यांच्या विविध क्षेत्रांवरील एनए टॅक्स (बिनशेती सारा) थकविला आहे. गेल्या १३ वर्षापासून तो प्रलंबित असल्याने अखेर महसूल विभागाने महापालिकेच्या भूमी जिंदगी विभागाला थकीत कर भरण्याची नोटीस बजावली आहे.
नोटिसीनुसार ती रक्कम १७ कोटी ७६ लाख रुपये इतकी आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४४ नुसार महसूल विभागाकडून बिनशेती शेतसारा वसूल केला जातो. पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीमधील एकूण ११ गावांमधील काही भूखंडांवरील अकृषिक सारा आकारणीची मागणी महसूल विभागाने केली आहे.
त्यामध्ये किवळे, रावेत, चिंचवड, पिंपरी, सांगवी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, भोसरी, दापोडी, आकुर्डी, निगडी या गावांमधील ४ लाख ८९ हजार ९१०.२४ चौरस मीटर क्षेत्रावर ही आकारणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या निगडीतील अपर तहसीलदारांमार्फत त्याची माहिती काढण्यात आली.