- सात जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- गुंतवणुकीवर दीडपट परतावा देण्याच्या आमिषातून गुंतवणूकदारांची १ कोटी ११ लाख २८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कंपनीच्या संचालकांसह सात जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गुजरातमधील सुरत येथील डी.एस. जी. एम. इंडिया कंपनीचे संचालक भार्गव पंड्या, शिवानीबेन भार्गव पंड्या, अध्यक्ष महेंद्र पंड्या, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिन सिंग, पणन विभागाचे अधिकारी राजेश धिमान, कामरान भगेल, संजय खान (रा. कुरुक्षेत्र, अंबराला, चंदीगड) अशी आरोपींची नावे आहेत.
दत्तात्रय मारुती खुणे (वय ४८, रा. जी.एम. सी. निवारा, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित कंपनीने डिसेंबर २०१८ आणि मार्च २०१९ मध्ये काळभोरनगरमध्ये मेळावा घेत गुंतवणूकदारांना दीडपट परताव्याचे आमिष दाखविले होते.