- वाकड, सांगवी व पिंपरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरींचीही उकल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२१) :- प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल व रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी दरोड्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यांनी चोरून नेलेल्या मोबाईलच्या लोकेशनवरून त्यांचा शोध घेण्यात आला. हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. सलमान साबीर शेख (वय २१), शुभम श्रीकांत जाधव (वय १९), प्रेम बालाजी पोतदार (वय १९), ललित हरीकेस करोटिया (वय २०, सर्व रा. काळेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी बाळासाहेब कोंडिबा बंडगर (वय २८, रा. काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे १३ फेब्रुवारी रोजी रात्री भोसरी येथून भाडे घेऊन त्याच्या कॅब चारचाकी वाहनातून मुंबईकडे डांगे चौकमार्गे जात होते. त्यावेळी भूमकर चौकातून यू – टर्न घेऊन महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून जात असताना आरोपींनी त्यांची दुचाकी आडवी लावून फिर्यादीची चारचाकी अडविली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून १५ हजारांचा मोबाईल व रोकड जबरदस्तीने चोरून नेली.
याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. चोरट्यांनी चोरून नेलेला मोबाईल फोन ओला / उबेर कंपनीचा असल्याने सदर कंपनीला मोबाईलचे लोकेशन प्राप्त झाले. पोलिसांनी कंपनीच्या माध्यमातून लोकेशन मिळवून आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १५ हजारांचा मोबाईल व ६०० रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. अधिक चौकशी केली असता आरोपींनी वाकड, सांगवी व पिंपरी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोऱ्या केल्याचे सांगितले.
या गुन्ह्यांतील ३८ हजार ५५३ रुपयांचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींनी केलेल्या चार गुन्ह्यांची उकल झाली असून, जबरीने चारलेले चार मोबाईल, इतर पाच मोबईल, दोन दुचाकी असा एक लाख ११ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला आहे.