- वाकडमधील घटना; दोघांना पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. फेब्रुवारी २०२१) :- दुचाकी चोरून नेल्याचे सांगून तरुणाला मारहाण केली. त्यामुळे बदनामी झाली. चोरीचा आळ येऊन नैराश्य आल्याने तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
अजय बबन पडघाण (वय २८, रा. जगताप डेअरी, वाकड, मूळ रा. जुमंडा, ता. जि. वाशिम), असे मयत तरुणाचे नाव आहे. तर, याप्रकरणी विशाल पोपट आढाव, तेजस विजय शिंदे (दोघेही रा. वाकड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अजय पडवाण हा सिक्युरिटीचे काम करीत होता. मयत अजय हा आरोपी विशाल आढाव याची दुचाकी न सांगता घेऊन गेला होता. त्यामुळे अजय व आरोपी विशाल हे दोघे पोलिसांकडे गेले होते. कामानिमित्त मी गाडी घेऊन गेलो होतो, मी गाडी चोरली नाही, असे त्यावेळी अजय पडघाण याने सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी त्याला मारहाण केली होती. त्यामुळे आपली बदनामी झाली, असे वाटून अजय याला नैराश्य आले. त्यातून त्याने मानकरवस्ती, वाकड येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.