- उद्योजकाला धमकी; मानकर चौकातील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. फेब्रुवारी २०२१) :- फर्निचरच्या दुकानात येऊन जीवे मारण्याची धमकी देत दरमहा १० हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली. वाकड, हिंजवडी रस्त्यावर मानकर चौकात शुक्रवारी (दि. १९) रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी दोन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार मानकर, प्रदीप जगताप (दोघे रा, कस्पटे वस्ती, वाकड) अशी खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत हिम्मत चैनाराम सोलंकी (वय ३४, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोलंकी यांचे मानकर चौकात व्ही. एस. फर्निचर नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मोठा भाऊ प्रकाश सोलंकी दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी दुकानात आले. ‘महिन्याला दहा हजार रुपये दे नाही तर तुला खल्लास करून टाकीन ‘, अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.