- तक्रारदाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार; पोलिसाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
(पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२१) :- गुन्ह्यात मदत करण्यासाठी एकाकडून ५० हजारांची लाच घेणारा पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी ही कारवाई झाली. सचिन कुबेर जाधव (वय ३७) असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वाकड पोलीस ठाण्यात जाधव पोलीस नाईक या पदावर कार्यरत होता. एसीबीचे सहायक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ४९८ अ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
अटकेची प्रक्रिया करून जामिनावर सोडण्यासाठी व गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी पोलीस नाईक सचिन जाधव याने दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारण्याचे जाधव याने मान्य केले. त्यापैकी ५० हजार रुपये लाच त्याने स्वीकारली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.