- विरोधक अंगावर येणार कळताच; सत्ताधाऱ्यांकडून सभा तहकूब..
- भाजपला पारदर्शक कारभार नडतोय का?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
(पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. २२) १६ दिवसांसाठी तहकूब करण्यात आली. सभा ९ मार्चला दुपारी दोनला होणार आहे. सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी ‘ भाजप हटाओ ‘ लिहलेले शर्ट घालून व घोषणाबाजी करीत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
सभेसमोर शहरातील मैलासांडपाणी पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण प्रकल्पाचा ६५४ कोटी खर्चाचा प्रस्ताव आहे. तसेच, यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईच्या ७ वर्षे कालावधीच्या ४६४ कोटी खर्चाचाही प्रस्ताव आहे. तसेच, गांधीनगर झोपडपट्टी पुनवर्सन ५०८ कोटी, जागामालकांस ११० कोटी देण्याचा प्रस्ताव आहे. हे तीन महत्वाचे विषय सभेसमोर आहेत. स्थायीचा अध्यक्ष कोण होणार, यावर त्यांची गणिते ठरणार आहेत.
‘ भाजप हटाओ, पीसीएमसी बचाओ’ लिहलेले शर्ट घातून सभागृहात निघालेले विरोधी नगरसेवक पाहून सभाच तहकूब करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला. सभा तहकुबीची विनंती पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली. त्यास विकास डोळस यांनी अनुमोदन दिले. त्यावर महापौरांनी तत्काळ सभा तहकूब केली. दरम्यान, विरोधकांनी ‘ भाजप हटाओ, पीसीएमसी बचाओ ‘ असे लिहलेले शर्ट घालून सभागृहात प्रवेश केला होता. भाजप विरोधात घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची तयारी विरोधकांनी केली होती. मात्र, सभाच तहकूब झाल्याने त्यांना विरोध दर्शविता आला नाही.