- झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- स्पाईन सिटी परिसरात झाडाला बांधलेल्या अवस्थेत एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी (दि. २४) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी प्राधिकरण येथील स्पाईन सिटी परिसरात एका झाडाला अंदाजे ३५ ते ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह मिळून आला. एका महिलेने सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आला.
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.