- १०० पेक्षा अधिक उपसूचना; निधीच्या कमी तरतुदीमुळे अनेक सदस्य नाराज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या ७ हजार ११२ कोटींच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने बुधवारी (दि. २४) झालेल्या विशेष सभेत मंजुरी दिली. मंजुरी देताना तब्बल २५० कोटींच्या कामांच्या १०० पेक्षा अधिक उपसूचना दिल्या आहेत. परिणामी, फुगवटा असलेला अर्थसंकल्प आणखी फुगला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे ५ हजार ५८८ कोटी ३५ लाखांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीसमोर गुरुवारी (दि. १८) सादर केला. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसह एकूण ७ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष खर्च ५ हजार ५८६ कोटी ३५ लाख होऊन मार्च २०२२ अखेर २ कोटी ४३ लाख शिल्लक राहतील असा अंदाज आहे.
विविध विकासकामांसाठी १ हजार ६३० कोटींची तरतूद केली आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे पालिकेचे मिळकतकर, बांधकाम परवानगी, पाणीपुरवठा आणि इतर शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे उद्दिष्टे पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. अशी परिस्थिती असताना कोरोनातून परिस्थिती सावरून दैनंदिन जीवन व व्यवसाय पूर्वपदावर येऊन पालिकेचे तिजोरीत अपेक्षित भरणा होईल, अशा अपेक्षेवर आयुक्त पाटील यांनी करसंकलन, बांधकाम परवानगी, पाणीपुरवठा आदी विभागाचे उत्पन्न दुपटीने वाढवून ठेवले आहे.
पाणी कर संकलनासाठी ९५० कोटी, पाणीपट्टीसाठी ९५ कोटी, बांधकाम परवानगी विभागासाठी ५२० कोटीचे उत्पन्न वर्षभरात मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, इतके उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी असल्याने फुगवटा असलेला अर्थसंकल्प झाला आहे. १६ सदस्यांनी क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, उद्यान, सुशोभीकरण आदी प्रमुख कामांसाठी तब्बल २५० कोटी खर्चाच्या सुमारे १०० पेक्षा अधिक उपसूचना दिल्या आहेत. अर्थसंकल्पात कामांचा समावेश केला आहे. मात्र, निधीची खूपच कमी तरतूद केल्याने कामे पूर्ण कशी होणार, अशा तक्रारी व्यक्त करीत अनेक सदस्यांनी संताप व्यक्त केला.