- पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- कुख्यात राकेश भरणे टोळीतील गुन्हेगार अनिल तुकाराम मोहिते याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे. त्याला येरवडा कारागृहात बुधवारी (दि. २४) स्थानबद्ध करण्यात आले आहेत. पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत आदेश दिले.
अनिल तुकाराम मोहिते (वय ४४, रा. वाकड) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मोहिते हा कुख्यात गुन्हेगार राकेश भरणे टोळीचा सदस्य आहे. त्याच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
खून, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून जागेचा ताबा घेणे, दहशत माजवून नागरिकांना वेठीस धरून नाहक त्रास देणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. आरोपी मोहिते याने २०१३ पासून वाकड आणि पिंपरी परिसरात पाच गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्ह्यांचा वाढता आलेख पाहून वाकड पोलिसांनी मोहिते याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता.