- पात्र व प्रतिक्षा यादीतील अर्जदार वगळून इतरांना मिळणार डीडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. मार्च. २०२१) :- महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, बो-हाडेवाडी व रावेत गृहप्रकल्पाच्या सोडतीमध्ये पात्र ठरलेल्यांच्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना स्वहिश्श्याची १० टक्के रक्कम जमा करावी लागणार आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांकडे ज्याप्रमाणे बँक कर्ज प्रकरण केले जाते. त्याप्रमाणे कर्ज प्रकरण करून ३ टप्प्यात स्वहिस्सा भरावा लागणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या तीन गृहप्रकल्पातील एकूण ३ हजार ६६४ सदनिकांसाठी सोडत शनिवारी (दि. २७) काढण्यात आली. प्रतिक्षेतील २ याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यासाठी तब्बल ४७ हजार ८०१ अर्ज पात्र ठरले. पात्र अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची प्रथम छाननी केली जाणार आहे.
दरम्यान, वरील तीनही ठिकाणच्या गृहप्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास किमान दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर पात्र अर्जदारांना सदनिकांच्या चाव्या मिळतील, असे अधिकाऱ्यांनीं स्पष्ट केले. तीन टप्प्यांत स्वहिस्सा लाभार्थ्यास ४०, ४० व २० टक्के असा स्वहिस्सा बांधकामांच्या विशिष्ट टप्प्यावर भरावा लागणार आहे.
पात्र व प्रतिक्षा यादीतील अर्जदार वगळून इतरांना डीडी परत केले जाणार आहे. त्यासाठी लेखा विभागाच्यावतीने स्वतंत्र मनुष्यबळ नेमले. डीडी लवकरात लवकर जमा केले जातील, असे महापालिकेचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.