- प्रकल्पासाठी ५०० जणांचे ऑनलाइन अर्जही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. मार्च. २०२१) :- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्पासाठी चार दिवसांपूर्वी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. आत्तापर्यंत २ हजार जणांनी त्या अंतर्गत ऑनलाइन नोंदणी केली आहे. तर, ५०० जणांचे ऑनलाइन अर्ज आले असल्याची माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी सोमवारी दिली.
प्राधिकरणाने चिखली – पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्पातील घरांसाठी नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. ऑनलाइन अर्जासाठी २६ फेब्रुवारीपासून नोंदणी प्रक्रियेला सुरूवात झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी, अर्ज शुल्क व अनामत भरण्यासाठी प्राधिकरण प्रशासनाने ३० मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे.
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी ५ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. तर, ९ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. १६ एप्रिलला प्राधिकरण कार्यालयात सकाळी ११ वाजता सोडत निघणार आहे. सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहेत.