- पालिकेकडून दहावी, बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- शहरातील तीन हजारांहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना पावणेचार कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण संपादन केले, त्यांच्या पाठीवर महापालिका कौतुकाची थाप टाकणार आहे.
महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून काही रक्कम देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दहावीत ८० ते ९० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये, तर बारावीत ८० टक्क्यांहून अधिक अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये रक्कम बक्षीस आहे. दहावीत ८० ते ९० टक्के गुण मिळविणारे ६४६,तर ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे ८६४ तर, बारावीत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे ५३६ असे ३ हजार ४६ विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यासाठी ३ कोटी ७४ लाख ६० हजार रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.
अशी खर्च होईल रक्कम :-
दहावीत ८० ते ९० टक्के गुण मिळविणारे १६४६ विद्यार्थी – १ कोटी ६४ लाख ६० हजार तर दहावीत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणारे ८६४ विद्यार्थी – १ कोटी २९ लाख ६० हजार, बारावीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणारे ५३६ विद्यार्थी – ८० लाख ४० हजार.