- पालकमंत्री अजित पवारांच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष…
- लॉकडाऊन नकोच समस्त शहरवासीयांची एकमुखी मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी पुन्हा एकदा कडक स्वरुपाचा लॉकडाउन लागण्याची शक्यता कमीच आहे. लॉकडाउनला होणारा विरोध लक्षात घेता त्याऐवजी निर्बध अधिक कडक होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांकडून वर्तविण्यात आली. याबाबत आज शुक्रवारी निर्णय घेण्यात येणार आहे. पुण्यात (दि. २) उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमुळे प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थितीत राहणार आहेत. पुणे पालिकेच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी १० वाजता ही बैठक होईल. या बैठकीला पुण्यातील लॉकडाउनबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे
दि. १ एप्रिलपर्यंत रुग्णसंख्या घटली नाही तर लॉकडाउन लावावा लागेल, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गत आठवड्यात दिला होता. मात्र, गेल्या आठवडाभरात पुणे शहरासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या अधिकच वेगाने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाउन लागणार, अशा पद्धतीची चर्चा आहे. मात्र, शहरात लॉकडाउन लावण्यास सत्ताधारी भाजपने आता थेट विरोध दर्शविला असून त्याविरोधात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आहे. याशिवाय क कष्टकरी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री लॉकडाउन करण्याचा निर्णय घेणार का याबाबत उत्सुकता आहे. मात्र, प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , कडक लॉकडाउन लावण्याचा निर्णय शक्यतो घेतला जाणार नाही. त्याऐवजी निर्बंध अधिक कडक केले जातील.
त्यात प्रामुख्याने रात्रीची पूर्ण संचारबंदी, बाजारपेठांमधील दुकाने पुन्हा सह सम – विषम पद्धतीने उघडणे, धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद ठेवणे, सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेवर निबंध आणणे, लग्न आणि दहाव्यांमधील उपस्थितांच्या संख्येवर आणखी निर्बंध आणणे अशा प्रकारच्या कडक उपाययोजना करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.